Author : BABURAO ARNALKAR
ISBN No : B0744F58ND
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : BookHungama
मृत्युदंड!
नोव्हेंबर महिन्याच्या बावीस तारखेच्या सकाळी बरोबर दहा वाजता येरवड्याच्या तुरुंगात मोठ्याने घंटानाद होऊ लागला होता. गैनीनाथ साधले याला फासावर चढविण्यात आले ही गोष्ट तो घंटानाद साऱ्या जगाला जाहीर करीत होता.
त्याआधी दहा मिनिटे ते फाशीच्या जागेपासून जवळच असलेल्या त्याच्या कोठडीत गेले होते. त्यांनी त्याचे दोन्ही हात एकत्र बांधले होते. नंतर त्याला दोहो बाजूला पांढरा रंग दिलेल्या भिंतीमधल्या अरुंद मार्गातून चालवीत फाशीघरात नेले होते. त्याने घेतलेले ते जगाचे अखेरचे व ओझरते दर्शन होते.
गैनीनाथ अतिशय त्वरेने पावले टाकीत होता. त्यामुळे त्याच्या दोहो बाजूला असलेल्या वॉर्डर्सना आणि पाठीमागून येणाऱ्या बंदूकधारी पोलिसाला धावावे लागत होते. जणू काय ते शेवटचे अप्रिय काम शक्य तितक्या लवकर संपवावे अशी गैनीनाथाला घाई झाली होती.
त्या फाशीघरात आणखी तीन माणसे त्यांची वाट पाहात होती. त्यातील एक तुरुंगाचे मुख्य जेलर होते, दुसरे डॉक्टर होते आणि तिसरा, ज्याने अनेकांच्या मानेला फास लावला होता तो काळू मांग तेथे होता.
त्याठिकाणी एक लाकडी चौथरा तयार केलेला होता. चौथऱ्याच्या मध्यभागी दोन मजबूत उभे खांब होते आणि त्या दोन खांबांवर तिसरा आडवा खांब होता. त्या मधल्या खांबाला फाशीची दोरी लटकत होती. ती दोरी तसल्या कामात पटाईत असलेल्या एका कैद्याने बनविलेली होती. काळू मांगाने ती व्यवस्थित तपासून पाहिली होती. नंतर तिचे एक टोक त्या खांबाला बांधले होते. दुसऱ्या लोंबत्या टोकाला त्यानेच तयार केलेला फास होता.
गैनीनाथाला वॉर्डर्सनी त्या दोन खांबांमधील खडूंचे वर्तुळ असलेल्या जागेवर उभे केले. नंतर त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर आणि घाबरलेल्या डोळ्यांवर एक काळी टोपी चढविण्यात आली होती. त्या टोपीने त्याचा नाकापर्यंतचा भाग झाकला गेला होता. आता फक्त त्याचे हलणारे पातळ ओठ व त्या ओठांवर हलणारी काळी पांढरी मिशी तेवढी दिसत होती.
नंतर काळू मांगाने त्याच्या गळ्यात तो फास अडकविला. त्या फासाची गाठ बरोबर त्याच्या डाव्या कानाखाली येईल याकडेही त्याने लक्ष दिले होते. ते झाल्यानंतर बाकीची सर्व मंडळी त्या चौथऱ्यापासून दूर झाली आणि काळू मांग कोपऱ्यात बसविलेल्या एका लोखंडी दांड्याजवळ उभा राहिला. त्याने तो लिव्हर खेचला की, कैद्याच्या पायाखालच्या फळ्या खाली झुकणार होत्या आणि मधे निर्माण होणाऱ्या पोकळीत गैनीनाथ लोंबकळणार होता.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्याला कायद्याने देण्यात येणाऱ्या त्या सर्वात मोठ्या शिक्षेपूर्वी त्याला काही सांगायचे आहे काय असे जेलरसाहेबाने विचारले.
आणि गैनीनाथ चिडून म्हणाला, ‘एकदा हे लवकर आटपा!’
जेलरसाहेबांच्या इशाऱ्याबरोबर काळू मांगाने तो लोखंडी दांडा खेचला. त्याबरोबर पायाखालच्या फळ्या खाली पडून गैनीनाथ लोंबकळू लागला. त्याला बसलेल्या पहिल्याच हिसक्याबरोबर ती फासाची दोरी मानेत रुतून गैनीनाथाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले होते.
समोरच्या घड्याळात सहाचे टोल पडत होते. घंटानाद सुरू झाला होता. गैनीनाथाच्या मृत्यूची बातमी जगाला समजली होती. डॉक्टर लाकडी चौथऱ्यावर चढले होते व गैनीनाथ जिवंत नाही असे जाहीर केले होते.
पण हे सर्व आधी अनेक गोष्टी घडल्यानंतरच घडले होते आणि त्या प्रकरणात मदत केल्याबद्दल एका स्त्रीने झुंजारचे मन पूर्वक आभार मानले होते.
गैनीनाथाने मृत्युदंडाची शिक्षा भोगली होती. म्हणूनच झुंजारच्या ‘एकविसावा मृत्युदंड’ या कथेत यापूर्वी काय घडले होते ते पाहणे मनोरंजक आहे तसेच आवश्यकही आहे आणि आता आपण तेच करणार आहोत!