Author : BABURAO ARNALKAR
ISBN No : B074CXYKN5
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : BookHungama
दुर्लभदासाने डोळ्यांची उघडझाप करीत टेलिफोनकडे पाहिले आणि तो स्वतःशीच म्हणाला ‘अरेच्या ! हा काय प्रकार आहे?’
त्याच्या डोक्यावरच टांगलेल्या दिव्याचा प्रखर प्रकाश त्याच्या निस्तेज हातावर आणि टेबलावरील तेजस्वी हिऱ्यावर पसरला होता. त्या खोलीतील बाकीचा भाग अंधारात होता. टेलिफोनची घंटी वाजतच होती आणि दुर्लभदास पुटपुटत होता, ‘हा सैतानाचा शोध आहे!’
तो आपल्या खोल डोळ्यांनी टेलिफोनकडे पाहात होता. त्याच्या पापण्यांवरही अनेक सुरकुत्या पडल्या होत्या. सध्या अंधार असलेली खोली छोटीशीच होती. त्या खोलीच्या कोपऱ्यात जुनी पुस्तके आणि कागदपत्रे आणि जवाहिरांच्या छोट्या-मोठ्या पेट्या होत्या. दुर्लभदास त्या घरात एकटाच होता आणि टेलिफोनच्या कर्कश आवाजाशिवाय त्या घरात आणि घराबाहेरही शांतता पसरली होती.
वृद्ध दुर्लभदासाने आपला हडकुळा हात पुढे करून टेलिफोनला स्पर्श केला आणि आपल्या बोटांना विजेचा धक्का बसला असे त्याला वाटले. त्या ठिकाणी तो टेलिफोन ही एकच नवीन आणि आधुनिक वस्तू होती. ती वस्तू दुर्लभदासाच्या डोळ्यांना आणि कानांना त्रास देणारी होती. पण सध्याच्या आधुनिक जगात धंदा कण्यासाठी तसल्या आधुनिक यंत्राचीही आवश्यकता होती. दुर्लभदास लोभी नव्हता. त्याला आपल्या उजव्या हाताखाली लपविलेल्या वस्तूकडे पाहाताच अतिशय आनंद झाला होता. तसल्या वस्तू पाहणे हेच त्याचे समाधान होते.
त्याने रिसिव्हर उचलताच घंटीचा आवात थांबला आणि तो म्हणाला, ‘होय मीच. पण आपण कोण?’
‘माझी प्रकृती बरी आहे, मी आपला आभारी आहे. ही जुनी हाडे आणखी बरीच वर्षे पाहतील असे दिसते. पण आपण कोण?