PASTISAVAY PALAYAN

Author : BABURAO ARNALKAR

ISBN No : B074H2LNP4

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : BookHungama


नव्या संघर्षाची सुरुवात!
इन्स्पेक्टर आनंदरावांनी आपल्या अधिकृत रिपोर्टात लिहिले होते -
“झुंजारने सभ्यतेचा पांघरलेला बुरखा फेकून आपण कायद्याची तमा न बाळगणारे एक उठावगीर आहोत असे जाहीर केले असले तरी त्यामुळे त्याला पकडणे पूर्वीपेक्षा सोपे जाणार नाही. आतापर्यंत त्याच्याशी माझा जो संबंध आला आहे त्यातील प्रत्येक प्रकरणातील त्याने हेरलेल्या सावजाची एक तर त्याच्या विरुद्ध तक्रार करण्याची हिंमत होत नाही किंवा आपण तो गुन्हा घडला त्यावेळी आसपास कुठेही नव्हतो असे सिद्ध करणारा अभेद्य पुरावा झुंजारजवळ असतो असा माझा अनुभव आहे.”
“शिवाय झुंजारजवळ जी काही साधने आहेत त्यांच्याशी आपली संघटना यशस्वी मुकाबला करू शकत नाही. तो अत्यंत बुद्धिमान आहे, यांत्रिक करामती करणारा आहे आणि अतिशय धाडसी व शूर आहे. या शहरात त्याने आपली कारकीर्द सुरू केल्यापासूनच त्याला एकदा तरी अटक करण्याची माझी इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. कारण त्याच्याविरुद्ध आम्ही गोळा केलेला पुरावा प्रत्यक्ष प्रसंगी निरर्थक ठरतो आणि आम्हीच हास्यास्पद ठरतो...”
आनंदरावांनी त्या रिपोर्टात आणखीही बरेच लिहिले होते. पण त्या सर्वांचा सारांश एवढाच होता की, झुंजारला कायद्याच्या कचाट्यात पकडणे ही त्यांच्या मते अशक्य कोटीतील गोष्ट होती.
या रिपोर्टामुळे आनंदरावांचे अर्थातच समाधान झाले नव्हते आणि ज्यांना तो रिपोर्ट सादर करण्यात आला त्या कमिशनरांचेही समाधान झाले नव्हते. त्यांनी आनंदरावांना अगदी स्पष्ट शब्दात तसे सांगितले होते. साहेब आनंदरावांवर अतिशय रागावले होते आणि त्यांनी आनंदरावांची कडक शब्दात हजेरी घेतली त्यावेळी तेथे इतर अनेक अधिकारी होते आणि ते सर्व गालातल्या गालात हसत आहेत असे आनंदरावांना वाटल्यामुळे ते मनातून साहेबांपेक्षाही झुंजारवर जास्त संतापले होते.
अर्थात झुंजारला आनदरावांच्या किंवा त्यांच्या साहेबांच्या रागाची पर्वा नव्हती. तो विजयेसह अगदी मजेत होता. तो कुणाबद्दल चिंता करीत नव्हता. मात्र इतर अनेकजण त्याच्याबद्दल चिंता करीत होते आणि विचारही करीत होते.
खुशालसिंग त्यापैकी एक होता. तो आता आर्थर रोड तुरुंगात त्याच्यावर भरण्यात आलेल्या खटल्याबद्दल विचार करीत होता. त्याची स्वतःच्या आयुष्याविरुद्ध तक्रार होती आणि झुंजारविरूद्धही होती. आपल्या नशिबाने आपल्याला कधी हात दिला नाही, उलट पदोपदी तोंडघशीच पाडले असे तो मानीत होता.
आणि त्याचे ते म्हणणे बरोबर होते. मुंबईत चोरुन आणलेल्या बेकायदेशीर हिऱ्यांच्या मोठ्या पार्सलाचा अर्धा भाग त्याला मिळणार होता. पण आता तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच्याजवळची जी रक्कम आपल्याजवळ जमा केली होती, ती अवघी पाच रुपये चौदा आणे भरली होती.
खुशालसिंगाप्रमाणेच पोलीसही झुंजारबद्दल विचार करीत होते आणि त्यातल्यात्यात आनंदराव जास्त विचार करीत होते. खरे म्हटले तर त्यांना खुशालसिंगच्या दुर्दैवाबद्दल मुळीच सहानुभूती वाटत नव्हती. पण तुरुंगातील कोठडीत त्याच्याऐवजी झुंजार बसायला हवा होता असे मात्र त्यांना मन:पूर्वक वाटत होते.
आनंदरावांप्रमाणेच सी. आय्. डी. चे जे तीन डझन अधिकारी झुंजार जेथून मुंबईबाहेर निसटण्याची शक्यता होती अशा अनेक ठिकाणी दबा धरून बसले होते, त्यांचीही त्याला पकडून त्या तुरुंगाच्या कोठडीत बंद करण्याची इच्छा होती. तेही झुंजारचा सारखा शोध करीत होते, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते.
पण झुंजार त्यांच्या डोक्यापासून दहा हजार फुटांवरून ढगात मिसळून हवेतून तरंगत केव्हाच मुंबईबाहेर गेला होता आणि तो एकटाच गेला नव्हता.
 

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories