Author : VAIJANTI KALE
ISBN No : 22022023M03
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : SWARUPDEEP PRAKASHAN
"नाहीतर, " महिपालने महाप्रयासाने ओठांवर आलेले, "नाहीतर मी जीव देईल!'' हे वाक्य गिळून टाकले. आईला दुःख देणे त्याला शोभले नसते. तो आवाजात हलकासा खेळकरपणा आणण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, "नाहीतर घरातले एक खाणारे तोंड तरी कमी होईल! सगळ्यात जास्त भाकरी मलाच लागतात नाहीतरी!"
कितीही खेळकरपणाने तो बोलला तरी या वाक्याने त्याच्या आईला रडू कोसळलेच. मग मात्र महिपालने मन घट्ट केले. तो म्हणाला, 'अशी रडू नकोस, आपल्याला वाट काढायला हवी ना? मी आज पुण्याला जातो. तिथे काम मिळेल.
शिकायला मिळेल. माझं बस्तान जरा बसले की एकेकाला तिकडे घेऊन जातो." "कुठे राहशील ? काय करशील?" आईने कळवळून विचारले, “फार कठीण परीक्षेला बसणार आहेस बघ!' "
"आई, कठीण परीक्षा तर होणार आहे!" महिपालने आईच्या खांद्यावर हात ठेवला. एका लांबलचक सतरंजीवर सगळी मुले ओळीने झोपली होती. सर्वात कडेला तान्ह्या कुमारला मांडीवर घेऊन आई महिपालशी बोलत होती. कुमार तान्हा, कोवळा म्हणून त्याला तेवढे सतरंजीवर मऊ चौघडीचे अंथरूण तयार केलेले होते. आपले दोन कपडे, वडिलांच्या जुन्या धोतरात महिपालने नीट गुंडाळून घेतले. तेवढेच त्याचे सामान. "रात्रीचा निघतोस ?"