Author : SANJAY RAUT
ISBN No : 9789348458520
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : NEW ERA PUBLISHING HOUSE
मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण 'नरकातला स्वर्ग.' भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल... राजू परूळेकर